कुसुमाग्रज
(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथे. नासिक येथे शिक्षण. बी. ए. झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपटव्यवसायात होते. पुढे १९४९ पर्यंत पुणे, मुंबई व नासिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नासिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. कुसुमाग्रज जीवनलहरी (१९३३), विशाखा (१९४२), किनारा (१९५२), मराठी माती (१९६०), स्वगत (१९६२), हिमरेषा (१९६४) व वादळवेल (१९७०) हे त्यांचे काही प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे.